उंब्रजच्या मांगवाडी-शिवाजीनगरात दोन बिबट्यांचा मुक्त संचार; शाळकरी मुले, महिलांमध्ये दहशत

कराड / उंब्रज मीनाक्षी पोळ, सातारा*दि. 12 सप्टेंबर 2026*कराड तालुक्यातील उंब्रज गावात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. मांगवाडी शिवाजीनगर मधील इरिगेशन टर्न ते पटवेकर पोल्ट्री फार्म या परिसरात गेल्या चार दिवसांपासून दोन बिबटे दिवसा-ढवळ्या दिसत आहेत.*चार दिवसांपासून दुपारी दर्शन*दि. 9 सप्टेंबर 2026 पासून दररोज दुपारच्या सुमारास हे दोन्ही बिबटे रस्ता क्रॉस करताना आणि शेतात शिरताना स्थानिकांना दिसले आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार त्यापैकी एक मादी बिबट्या आहे.*शाळकरी मुले आणि जॉगिंग ट्रॅक धोक्यात*हा रस्ता मांगवाडी शिवाजीनगर येथील शाळकरी मुलांच्या ये-जा करण्याचा मुख्य रस्ता आहे. याच मार्गावर वयोवृद्ध नागरिक वॉकिंगसाठी तर तरुणी भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या सरावासाठी रनिंगसाठी येतात. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती आहे.*पावलांचे ठसे आणि कुत्री गायब*दि. 11 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोल्ट्री जवळील दोन भटकी कुत्री अचानक गायब झाली असून परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.*वन विभागाने तात्काळ लक्ष द्यावे*सततच्या दर्शनाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ करत आहेत.